Failed to fetch language order
रक्षा बंधन
187 Posts • 2M views
Mr. Vik@s
729 views 2 months ago
#रक्षा बंधन चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला रेशमाच्या धाग्यांनी सजली राखी पौर्णिमा बंधुत्वाच्या बंधुतेची दे प्रेरणा मजला ... अशा भावस्पर्शी ओळीतून ही भावस्पंदने मनात रूजली आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक काळात संधी, तह, सलोखा, सामंजस्य, राज्य विस्तार, देशरक्षण, अशा भावनेतून सुरू झालेली ही रक्षाबंधन परंपरा एक संस्कार क्षम सण आहे. समाजपारावरून हा कौटुंबिक विषय चर्चेला घेताना मन भरून आले. पण सध्या साजरे होत असणारे सण पाहिले की मन विषण्ण होते. मूळ उद्देश समजावून न घेता केवळ मनोरंजनाचे माध्यम आणि एकत्र येण्याचे निमित्त म्हणून रक्षाबंधन या सणांकडे पाहिले जाते. आधुनिक काळात मात्र देणे घेणे यात नवी पिढी जास्त गुंतलेली आहे. भावनेला दिखाऊ पणाची आणि नात्याला हिशेबी व्यवहारीकतेची जोड मिळाल्याने या सणाचे मांगल्य, पावित्र्य कुठेतरी हरवत चालले आहे. बहिणीचे रक्षण आणि बहिणीने भावाच्या दिर्घायुष्यासाठी केलेले औक्षण , देवाकडे केलेली प्रार्थना ,भाऊ बहीण यांचे स्नेहभोजन हा हेतू या सणाचा बाजूला पडून या सणाकडे फक्त एकत्र येण्याचे निमित्त म्हणून पाहिले जात आहे. रक्षाबंधनाचा आणखी एक हेतू म्हणजे बहिणीने भावाला राखीच्या नाजूक भावबंधनात बद्ध करताना आपल्यावर जर एखादे संकट आले तर तै निवारण करण्यासाठी केलेली विनंती आणि भावाने आशिर्वाद देऊन रक्षण करण्याचे दिलेले वचन हा आहे. यासाठी : आपला भाऊ सदैव सावलीप्रमाणे उभा असावा आजन्म त्याचे प्रेम, स्नेह बहिणीला लाभावा म्हणून बहाणीने केलेले स्नेहबंधन म्हणजे रक्षाबंधन होय ......! कौटुंबिक मालमत्तेत बहिणीला मिळणारा वाटा यावर आता हे नाते आपला तोल सांभाळत आहे. कित्येक वेळा बहिण भावाचे रक्षण करते अशी उदाहरणे आपल्याला पहायला मिळत आहेत. अशा वेळी भाऊ आणि बहिण यांच्यातील भावनिक नाते, एकमेकांना साथ देण्याची आश्वासक भूमिका रक्षाबंधनाचा मूळ हेतू साध्य करू शकेल असे मला वाटते. भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला काय दिले यापेक्षा परस्परांनी एकमेकांना आपल्या ह्रदयात दिलेली जागा तो चंदनी पाट, एकमेकांची वाट पहाताना पाणावलेले डोळे, भेट झाल्यावर उजळलेले चेहरे आणि रेशमी राखीने अंगभर फिरणार्‍या मोरपिशी आठवणी या रक्षाबंधनाची महती जास्त प्रगल्भ करतात. बहिण लहान की मोठी या पेक्षा बहिण आणि भाऊ यांनी एकमेकांना बहाल केलेली अंतरीक माया ममतेची उंची या राखीला अलौकिक उंची प्राप्त करून देते. भावाला पोटभर जेवताना पाहून दाटून आलेला बहिणीचा स्वर, स्वतःची काळजी घे, येत जा या वाक्यातला आपलेपणा हा सण साजरा करून जातो. भावना, विचार आणि आचार यांच्या त्रिसूत्रीने हे रक्षाबंधन फक्त बहिणीची नाही तर प्रत्येक व्यक्तीमत्वात दडलेल्या माणसाची, त्याच्यातल्या माणुसकीची रक्षा करणारे आहे. चंद्राच्या सोळा कला ज्या प्रमाणे कला,सुख, समृद्धी, यांची वृद्धी आणि दुःख, दैन्य, दारिद्र्य यांचा क्षय करतात त्या प्रमाणे भाऊ बहीणीचे हे नाते स्वभाव, कला, स्नेह यांच्या चांदण्याने फुलत राहो अशी कवी कल्पना या सणाचे महत्त्व अधिक संवेदनशील करते. राखी हे निमित्त आहे माणूस माणसाशी जोडला जाणे ही मूळ भावना हे भावबंधन हा सण शिकवून जातो हेच खरे.
15 likes
12 shares
Mr. Vik@s
1K views 2 months ago
सुदर्शन चक्र शिशुपालाचे शर संधान केल्यावर कृष्णकडे परतत असताना कृष्णाच्या बोटाला छोटीशी जखम करून गेलं. जखम ही इतकी खोल की रक्ताची धार थांबेचना, शेवटी सुदर्शन चक्राचा वार तो, साक्षात प्रभूंवर झाला म्हणून काय त्याची तीव्रता कमी थोडीच होणार! राजवैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप धावपळ केली, लेप उगाळले, काढे पाजले पण तरीही काहीही उपयोग होईना, शेवटी नारद मुनी तिथं आले, म्हणाले प्रभू ही कुठली लीला तुमची. सारे उपाय थकले आता आपणच उपाय सांगावा. कृष्ण म्हणाला अरे नारदा लीला कसली त्यात, एक साधी जखम तर आहे होईल बरी आपोआप, त्याच एवढं काय घेऊन बसलात. नारद म्हणतात प्रभू जो विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र झटतो आहे त्याच्या जखमेतून रक्ताची संतत धार वाहते आहे, त्या प्रभूला वेदना होत आहेत व आम्ही काहीच करायचे नाही म्हणता हे कसं शक्य होईल, कृपया उपाय सांगावा, केवळ आपणच यावर उपाय जाणता व यामागे आपली काहीतरी लीला असावी हे मी जाणून आहे. नारदमुनी ऐकेचना तेव्हा शेवटी कृष्ण म्हणाला ठीक आहे नारदा ऐक तर उपाय, सुभद्रेच्या घरी जा व तिला म्हणावं तुळशीचा लेप दे, व तो लेप बोटाला बांधायला एक चिंधी दे, तिथं जर काम झालं नाही तर मग द्रौपदी कडे जा. नारदमुनी सुभद्रेकडे गेले, लेप व चिंधी मागितली, सुभद्रेने दासींना आज्ञा केली की तुळशीचा रस काढा. तुळशीच्या रसाचा लेप तर तयार झाला, त्याला रत्नजडित सोन्याच्या भांड्यात ठेवण्यात आलं व नारदामुनींकडे सुपूर्त करण्यात आलं, नारद मुनी म्हणाले सुभद्रे अग लेप तर छान दिलास पण चिंधी कुठाय? सुभद्रा म्हणते अहो मुनिवर दासींनी खूप शोधलं पण माझ्या एवढ्या भरजरी वस्त्रालयात चिंधी कुठून मिळावी? नारदमुनी मनातल्या मनात हसले, प्रभूंची लीला त्यांना आता उमगली होती, सुभद्रेचा निरोप घेऊन तिचा लेप न घेताच लगबगीने ते द्रौपदी कडे रवाना झाले, नारद मुनींनी मागणी करायचा अवकाश द्रौपदी ने त्वरित स्वतः तुळशीच्या पानांचा रस काढून लेप तयार केला, व पांडवांनी तिला भेट दिलेला त्रिभुवनातील सर्वाधीक किमतीचा असलेल्या शालुचा पदर फाडून त्याची चिंधी बनवताना शालू फुकट जाइल हा विचार देखील तिच्या मनाला शिवला नाही, मनात विचार होता केवळ आणि केवळ कृष्णाला लवकरात लवकर बरं कस वाटेल हा, असा लेप व चिंधी कृष्णाच्या बोटाला लावून त्याची रक्ताची धार तर लगेच थांबलीच, व जखम देखील भरून आली. या चिंधी चे मोल मी एक दिवस नक्की चुकवीन असे कृष्ण म्हणता झाला, व वस्त्रहरण होताना त्याच करंगळी तुन द्रौपदी ला वस्त्र पुरवीत राहिला. रक्ताच्या नात्या पेक्षा ही कधी कधी मानलेली नाती अधिक जवळची ठरतात, जेव्हा नात्यात व्यवहार डोकावत नाही, फायदा तोटा यांचे गणित आड येत नाही, बेधडक जे काही करायचं ते केलं जातं, ती नाती खरी, बाकीचे फक्त व्यवहार. अशा नात्यांनी शरीराच्या जखमा भरल्या जातातच पण मनावर झालेले असंख्य वार ही या नात्याच्या एका फुंकरीने बरे होतात. *चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.* रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.* #रक्षा बंधन
16 likes
18 shares