*तो_म्हणाला_सुंदर_दिसतेस________!!!!!!!!*
तो म्हणजे तोच....! त्या काळी म्हणजे तब्बल वीस ( आता तब्बल सत्तावीस वर्षांपूर्वी- पोस्ट करून झाले सात वर्षे😀) वर्षांपूर्वी आमच्या अख्ख्या पंचक्रोशीतला मोस्ट एलिजिबल बॅचलर ! उपवर मुलींच्या बापांची त्याच्यासाठी जणू काही रांग लागलेली अन् मग त्याची आई, पुरी तेलात तळताना टम्म फुगावी अगदी तश्शी गर्वानं फुगलेली ! त्याच्या बापाची छाती तर ते छप्पन ईंच का काय म्हणतात ना तशी झालेली ! हां... तर तो म्हणजे डी.एड़.करून नुकताच शाळेत मास्तर म्हणुन नोकरीवर रुजू झालेला. त्यावेळी डी.एड़ वाल्यांचा काय थाट होता याची आज तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. थाट म्हणजे काय!!!!! जणू काही फॉरेन रिटर्नच असायचं हो! 'यंदा कर्तव्य आहे' असं त्याच्या आईचं फर्मान निघालं, कानोकानी खबर पोहचली, तशी आसपासच्या गावांतुन पोरींच्या बापांची, पै पाव्हन्याची त्याच्या गावाकड रीघ लागली. पण कसलं काय हो... यायचा तो बाप, सोबत नकार घेऊन हात हालवत आला तसा परत जायचा! काय करणार पोरापेक्षा त्याच्या आईच्याच निकषांवर पास होणारी पोरगी भेटणं अवघड झालं होतं ! गोरीप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पानssssssssssss, ढवळी शिप्प्प्प्प्प्पत, सुंदददददददददददददददरररssssssssss ! ! !सुशीssssssssssssssल, शिकलेली , कामदार कन्या काही केल्या कुण्या गावात गवसेना, असं म्हणण्यापेक्षा यांनाच कुणात ते गुण गवसेना असच म्हणा ना ! तसा तो ही काही फार देखणा, हॅण्डसम होता असं काय नव्हतं बरं पण पगारानं त्याची पत लय म्हणजे लयच हाय झाली होती!
कुण्या शेजारनीनं आमच्या बापाला फुकटचा सल्ला दिला, बाप तर काय हो, आम्हाला घराबाहेर काढून द्यायची संधीच शोधत होता. आधी बापानं जे जे स्थळं आणले होते ना , त्यापैकी बहुतेक त्यांच्या ' बैठकीतल्या ' दोस्तांचेच पोरं होते. कोण ऊसतोडणीला जाणारा तर कोण विट भट्टीला जाणारा, एकाच तर स्वतःच देशी दारूचं दुकान होतं! (हे स्थळ बापाला सगळ्यात जास्त आवडलं होतं 😀) पण आईनं तिथं मोडता घातला. आता हा तर मास्तर होता मग काय बापाच्या डोक्यातली माझ्या लग्नाची वात अशी काही पेटली की लग्नाचा बार उडवूनच गप बसायचं असा जणू त्यांनी निश्चयच केला . मीही मनात म्हणलं जाऊ द्या, आई तरी किती दिवस आपलं लग्न अडवायला, बापाला आडवी येईल? आज ना उद्या बाप आपल्या गळ्यात हे लग्नाचं लोढणं अडकवल्या शिवाय गप्प बसणारच नाहीये. मग ऊसतोडणी, दारू भट्टीपेक्षा हा मास्तर मिळाला तर बरंच होईल, मास्तर आहे म्हणजे झालंच तर आपल्याला पुढं शिकायला पण देईल! सगळ्या बाजूनं विचार करून झाल्यावर मग मन म्हणालं, असू दे , जे होतं ते बऱ्यासाठीच होत असतंय! जातोय बाप तर जाऊदे !
आता आम्ही म्हणजे गरीबीची उत्तम मिसाल ! त्याचं काय असतं ना? गरीब घरी, गरिबी बरोबर कुपोषण ऑफर मध्ये फ्री असतंय. आम्ही त्याचे लाभार्थी होतो. आमचे मुळात खायाप्याचे वांदे! जिथं चेहऱ्यावर भूक लकाकत असते तिथं चेहऱ्यावरची तारुण्याची चमक तरी कुठून येणार हो? बरं सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधनाची काय गोष्ट ? फेअर अँड लव्हली कंपनीचे उपकार म्हणून कशी तरी पाच रूपयांच्या एका पाकिटात अक्खा एक महीना काढणारी मी! पौंडस पावडरच्या डब्यात ती गोल गादी असायची ती एकदा पावडर मध्ये बुडविली तर चार दिवस तीच चेहऱ्यावरून फिरवायची, का तर पावडरची बचत! तर हे सगळं असं असताना, आपली ही सावळी कम काळीच म्हणा ना, पोरगी त्या पोराच्या अन् त्याच्या आईच्या सौंदर्याच्या निकषांवर कशी काय टिकणार याचा जराही विचार न करताच बाप जाऊन त्याच्या घरी धडकला !!!! बापाला वाटलं आपली दूरची का होईना पण नात्यानं बहीण आहे , मग पत्त्करील पोरीला. पण आत्याबाईनं काय ताकास तूर लागू दिला नाय ! कसं काय आत्याबाई बरं हाय न वं ? .....असं ईचारायची पण तेंव्हा काय सोय नव्हती अन् खरं सांगायचं तर आपली हिंमतबी नव्हती बरं !!!! आत्याबाई सरळ म्हणाली ‘आरं भाऊ, कुठं महा पोरगा अन् कुठं तुही पोरगी ? काय जोड़ाघोड़ा शोभायला नको का ? आरं बोलायच्या आगुदर काय इचार बिचार तरी करायचा का नही? ' ते ऐकून, बाप अक्षरशः तोंडात जोड़ा मारल्यागत वापस आला.... !
बाप त्याच्या घरी जाऊन परत येईपर्यंतच्या सात तासात मी पाहिलेल्या सात जन्माच्या सप्तरंगी स्वप्नांचा पार सुपडासाफ नाही चेंदामेंदाच झाला की हो! म्हणजे काय ओ ? माधुरी दीक्षित, करीना अन प्रियांका चोप्रा सारखं गोरंपान अन् सुंदर असल्यावरच सुंदर स्वप्न पडतात असं थोडचये ? रंग काळा असला तरी काळ्या सावळ्या मुलींना पण रंगीत स्वप्न पडतात बरं का !!! बाप आईला म्हणला पोरगं म्हणतंय मला पोरगी सुंदरच पायजिल, तुमची पोरगी काय सुंदर नही. बाप आईला हे सांगताना, सपराच्या कुडाला कान लावून मी ऐकलंच होतं. किती वाईट वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. ऐकूण वाईट वाटलं पण मग आता काय डोकं आपटायचं ? डोकं आपटायऐवजी मी ठरवलं ..............डोकं चालवायचं ......! इकडं तिकडं नाही हो... शिक्षणात.... शिक्षणातच डोकं चालवायचं असं पक्कं ठरवलं !!!!!! काही दिवसांनी , त्याचं लग्न झाल्याचं समजलं तेंव्हा त्या नशिबवान मुलीचा खुप हेवा वाटला , नाही असं नाही..... खोटं कशाला सांगायचं ! पण असो.....असोच !!!!! तो विषयच टोट्ल बंद ! बंदच बरं ! ! ! ! ! ! ! ! त्याचं पुन्हा नाव काढायचं नाही !!!!!!
असो.... तर मागे एका लग्नाला जाण्याचा योग आला, म्हणजे फारच आग्रहामुळं जाणं भाग पडलं ! गाडी , बंगला ,पद , पगार, प्रतिष्ठा यांचं मला तसं फार काही अप्रूप नव्हतं अन नाही! बरं उठसूठ नट्टापट्टा करायचंही तसं फार काही वेड नाही. पण आता , लग्नसमारंभ म्हटलं की इच्छा असो की नसो थोडं नटावंच लागतंय! एक अलिखित नियम आहे तो. म्हणुन अगदीच नको वाटलं तरी जगाच्या लाजं काजं नटावं लागतचं हो, शेवटी समाज आहे , काय करणार !!!! मग काय मीही जरा छान भरजरी साड़ी नेसले , आता भरजरी साडी म्हंटल्यावर दाग दागिने न घालून कसं चालेल हो? मग ते ही फार नाही, पण घातलेच ! तयार होऊन निघाले तेव्हा नवरा गोड हसत म्हणाला 'छान दिसतेस !' मग मंगल कार्यालयाकडं जाताना त्यानं रस्त्यात गाडी थांबवून, तितक्याच रोमँटिकपणे छानसा मोगऱ्याचा गजरा घेतला अन माझ्या केसांत माळला ! ! ! ! ! ! !
मंगलकार्यालयात पोहचलो, तसं आमच्या मैत्रिणीने, गळाभेट घेत अगदी प्रेमाने हाताला धरून, आम्हाला समोर खास निमंत्रितांसाठी ठेवलेल्या सोफ्यावर सन्मानानं बसवलं ! थोडा वेळ होता म्हणुन सहज आसपास पाहिलं तर चार पाच लाईन मागे पाहिलं अन् मी बसल्या जागीच उडाले हो! माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्या खुद्द आत्याबाई......!!!आत्ता गं बाईsssssssssss या ईकडं कशा ? याच आहेत की त्यांच्यासारख्या दुसऱ्याच कुणी आहेत समजेनाच. त्या कशाला इकडं येतील? असेल दुसरं कुणीतरी म्हणून मी पुन्हा सामोर पाहू लागले. पण कसलं काय हो? डोक्यातून आत्याबाई जाईचना! कोण आत्याबाई म्हणजे काय विचारता हो ... आहो त्याच त्या , माझ्या 'नसासूबाई' म्हणजे न झालेल्या सासूबाई !!! पुन्हा मागं वळून पाहिलं आणि मग खात्री पटली , हो या त्याच आहेत. त्यांच्या जवळच माझ्याच वयाची 'ती' ! कदाचित तीच ती जिचा त्यावेळी हेवा वाटला होता. अन 'तो'..????..
तो आला असेल की नाही ? कामा न धामाचं उगंचच काळजात धस्स झालं हो ! क्षणार्धात डोळ्यासमोर कधीतरी हवाहवासा अन सतत पहावसा वाटलेला त्याचा चेहरा , त्यानं माझ्या बापाच्या तोंडावर फेकून मारलेला त्याचा नकार , आत्याबाईचा ताठलेला तोरा अन अपमान पचवून घरी परतलेल्या बापाचा उतरलेला चेहरा सारं काही लख्ख झालं, अगदी कालचीच गोष्ट असल्या सारखं !! लग्नविधि सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या सत्कार समारंभ सुरु झाला. अतिशय रटाळ अन् युसलेस गोष्ट म्हणुन आतापर्यंत मी नेहमीच ज्या सत्कार समारंभाला मनातल्या मनात शिव्या घातल्या , तोच सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला ! त्या दिवशी मात्र, ज्याने कुणी ही सत्काराची प्रथा सुरू केली असेल त्याचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानले! विशेष निमंत्रित असल्यामुळे माईकवरून बोलणाऱ्यानं माझंही नाव पुकारलं अन् मी स्टेजवर पोहचेपर्यंत तो माझ्या परिचयादाखल, आपलं सूत्रसंचलनाचं कसब पणाला लावल्यासारखं बरंच काही सांगत राहिला! प्रख्यात , विख्यात, नामवंत, लेखिका , कवयित्री , व्याख्यात्या , समाजिक कार्यकर्त्या इ . इ .इ विशेषणे इतकी गोड असतात हे आज पहिल्यांदा जाणवलं अन् पहिल्यांदाच ती विशेषणे आवडली बरं का! शपथ सांगते.......स्टेजवरुन उतरतांना आपण जणू काही आकाशातूनच खाली उतरत आहोत असंचं फीलिंग आलं होतं हो! निमित्त होतं आत्याबाई अन् मला नाकारणारा तो !!!! लग्न पार पडलं , खास निमंत्रित म्हणुन आमची जेवणाची जरा वेगळी सोय असल्यानं आम्हाला काही पंगतीत जेवणाऱ्यांच्या मागे नंबर लावून थांबावं लागलं नाही. पण जेवायला जाताना आत्याबाई अन् त्यांच्या सुनबाईकडे मात्र एक नजर गेलीच!!!! जेवण झालं ! ! !
कसं काय आत्याबाई, बरंय ना? ओळखंलं का मला? मी विचारलं, (आर्चिस्टाइलनं नाही बरं .... तुम्ही काहीही समजता !!!) व्हयं गं म्हणत त्यांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या चेहऱ्यावरून फिरवले अन त्यांच्याच कानाजवळ, त्यांचीच बोटं, मायेनं मोडली , विशेष म्हणजे ती कडकडा वाजलीही ! ! ! (बोटं मोडली असं नाही हं! ) अन काय सांगता.... आहो पाईपात अडकलेला एखादा कचऱ्याचा बोळा पाण्याच्या प्रेशरनं फटकन बाहेर निघावा तसा अचानक आत्याबाईचा मायेचा फ्लो ओसंडून वाहू लागला !!! मग त्यांनी सारी विचारपूस केली. आमच्या ह्यांना आवर्जून भेटल्या. माझ्या सुनेकडून नवरदेव आमच्या जवळच्या नात्यांत असल्यानं लग्नाला आलो हे ही सांगितले. '
ती'...... हो.... तिच.... ती!! त्यावेळी अख्ख्या पंचक्रोशीत नशीबवान ठरलेली ! ती तर बिचारी संसाराच्या ओझ्यांन जणू वाकुन गेली होती. आत्याबाईनं पोराला गाव सोडून शहरात राहायला जाऊ दिलं नाही हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलंच होतं. आता मास्तरची बायको असली म्हणून आत्याबाई काय थोडंच तिला घरात बसून ठेवत असणार? सौंदर्याच्या ज्या फूट पट्टीवर मोजून आत्याबाईनं अन् त्यानं तिला घराची दारं उघडली होती ती फूटपट्टीच जणू कामाच्या रगाड्यात मोडली होती, तिच्या त्या घरातल्या एन्ट्रीचा पासपोर्ट ठरलेला तिचा तो गोरा रंग पार सावळ्या शेडकड झुकला होता , डोळ्याभोवताली काळी वर्तूळ पसरली होती अन दोन्ही गाल आत बसले होते. हीच का ती ? असा प्रश्न पडावा अशी स्थिति ! आत्याबाई इतिहासाचं पुस्तक उघडून माझ्यासमोर सारं काही वाचत होत्या , सांगत होत्या पण माझं काही त्यात लक्ष लागेना . विचारावं तरी कसं तो आलाय का म्हणुन ? आणि एवढा वेळ झालाय तो यांच्याकडे आला कसा नाही? की दुरुन कुठूनतरी पहात असेल आपल्याला ? की समोर यायला संकोच वाटत असेल त्याला? अनेक प्रश्न मनात पिंगा घालू लागले, त्याच मनात, ज्यात कधी काळी, थोडा वेळ का होईना त्याच्या स्वप्नांनी पिंगा घातला होता! तेवढ्यात माझा नवरा आत्याबाईला म्हणाला, चला काकू आमच्या घरी जाऊया , फार दूर नाही जवळच आहे, इथलं सगळं संपेपर्यंत परत येता येईल. हो नाही करत आत्याबाई तयार झाल्या. नातवाला म्हणाल्या जा रे पप्पाला बोलव! माझा बाप त्याच्या घरी गेला होता तेंव्हा जसं छातीत धडधडलं होतं ना उगीचच अगदी तसंच माझ्या छातीत धडधाडायला लागलं! (छातीत धडधडण्याचा अन वयाचा काही एक संबंध नसेल का बरं 😆)
तो........हो.. तोच...तो..... !! एके काळचा मोस्ट एलिजिबल बॅचलर हाच का ? विश्वासच बसत नाहीये!!! तो आला, माझ्याकडं एक तिरका कटाक्ष टाकत माझ्या नवऱ्याकडं वळाला अन त्यांच्या हातात हात घेतला. चेहऱ्यावर मात्र जन्मठेपेची शिक्षा भोगून नुकत्याच सुटलेल्या कैद्यासारखे भाव पसरले होते ! सगळे घराकडं जायला निघालो. नवऱ्यानं आमची गाडी पार्किंगमधुन बाहेर काढली. आत्याबाई , ती आणि मी मागं बसलो तो पुढच्या सीटवर बसला. मध्ये बसलेल्या आत्याबाईच्या डावीकडे त्यांनी नाकारलेला भूतकाळ तर उजवीकडे त्यांनी कापूस पिंजावा तसा सारा परिसर पिंजून शोधून काढलेला वर्तमानकाळ बसला होता!!! 'त्या' काय विचार करत असतील बरं ? 'तो 'काय विचार करत असेल बरं ? अन 'ती' काय विचार करत असेल बरं ? त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मीच होलसेल मध्ये विचार करत होते. गाडी बंगल्याच्या गेट जवळ थांबली. आत येतांना आत्याबाई प्रचंड संकोचल्या होत्या ! अगदी प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही पण त्या क्षणाला या साऱ्या वैभवाचा अन् रूबाबदार नवऱ्याचा प्रचंड गर्व वाटला, त्या गर्वात असूया नव्हती, होती ती फक्त त्या नाकारलेल्या क्षणांच्या अपमानाची सल ! ! आत्याच्या घरून अपमानित होऊन परतलेला बाप जर आज हयात असता तर त्याला काय वाटलं असतं ? प्रश्न मनाला चाटुन गेला. घरात येताना नववधू जशी माप ओलांडून येते तशा कौतुकाचं भरलेलं माप ओलांडून आत आल्यासारखं आत्याबाई प्रत्येक गोष्टीचं अगदी ओसंडून खाली सांडेपर्यंत कौतुक करत होत्या. अगदी कोपरानकोपरा फिरून त्यांनी व सर्वानीच बंगला पाहिला, शोकेसमध्ये ओळीने लावलेली पुरस्कारांची सोनेरी सन्मानचिन्ह, आत्याबाईंनी आपल्या थकलेल्या डोळ्यांनी निरखून पहिली. तोंडभरून कौतुक तर चालूच होतं. चहापाणी झालं , निघताना आत्याबाईला आणि ' तिला ' दोघींनाही साड्या दिल्या. आमच्या ह्यांनी ''त्याच्या' खांद्यावर शाल टाकून त्याचाही सत्कार केला.
निघताना आत्याबाई म्हणाल्या ' लय चांगल झालं बाई तोह!!!!' मनात म्हंटल ' आत्याबाई ही सर्व तुमचीच कृपा, जे होतं ते बऱ्यासाठी !' परत सगळे गाडीत बसले , तितक्यात नवरा म्हणाला तू पण चल, आपण येताना पाटील सरांकडं जाऊन येऊ या. मीही पुन्हा त्यांच्या सोबत गाडीत बसले , विवाह स्थळी परतलो. तो अजुनही माझ्याशी एक शब्दही बोलला नव्हता. इतक्यात नवऱ्याला त्याचा मित्र भेटला. ते दोघं बोलत असल्या मुळे 'त्याला' माझ्याशी बोलल्या शिवाय पर्याय नव्हताच !
तो एवढंच म्हणाला, कशी आहेस... ? उत्तराची वाट न पाहता तोच म्हणाला , खुप सुखात आहेस, छान !!!!! खूप मोठी झालीस तू आता, खुप चांगल झालं तुझं !!!!!!!!!!!!! बोलता बोलता मध्येच शांत झाला, आणि मग म्हणाला ..... ' 'तू................नाही....म्हणजे.....तुम्ही....नाही....हे....काय बरं ते....हं.................तू आता खुप सुंदर दिसतेस !!!!!!' असं म्हणाला अन् लगेचच तो निघाला , जाताना माझ्या नवऱ्याचा निरोप घेतला !!!!
क्षणभर मी विचारात पडले, तेव्हा म्हणजे माझ्या वयाच्या अगदी विसाव्या वर्षी मला सुंदर नाही म्हणुन नाकारणाऱ्याला आता चाळीशी कधीच पार केलेली मी कशी काय बरं सुंदर दिसले ? खरं मी सुंदर आहे की माझ्या शिक्षणाचे नि कर्तुत्वाचे हे सौंदर्य आहे ? ????
आत्याबाई गाडीत बसायला निघाल्या तेव्हा मी धावतच गेले आणि वाकुन त्यांच्या पाया पडले ! मघाचा गर्व आणि अभिमानाचा वर्ख आता पार गळून पडला होता......... त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिला अन् मी मनात म्हणाले ' त्या वेळी तुम्ही नाकारलं नसतं तर आज माझ्या शिक्षणाची नि कर्तुत्वाच्या सौंदर्याची झळाळी माझ्या चेहयावर दिसली नसती !!!! धन्यवाद आत्याबाई !!! अन् नाकारल्या बद्दल 'तुझेही' लाख लाख आभार !!! नकारही चांगला असतो ! फक्त तो पचवता यायला हवा ... हो ना ? ? ?
*Sunita Borde*
#फिन्द्री #Findri #story #EmotionalStruggle
#नेटपर्णी #Netparni #womenpower #✍🏽 माझ्या लेखणीतून